Saturday, February 14, 2026

नेपियन्सी रोडचे होणार सिमेंट काँक्रिटीकरण, येत्या मंगळवारपासून कामाला सुरुवात

नेपियन्सी रोडचे होणार सिमेंट काँक्रिटीकरण, येत्या मंगळवारपासून कामाला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी एका मार्गिकेचे करणार काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेमार्फत, मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान नेपियन सी रस्ता या महत्त्वपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम येत्या मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ७७० मीटर लांब व २७.४५ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे काँक्रिटीकरण कामाच्या या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरते वाहतूक बदल, अंशतः रस्ता बंद तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र,पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेच्यावतीने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. टप्‍पा १ आणि टप्‍पा २ अंतर्गत शहर आणि उपनगर भागात काँक्रिटीकरण कामे सुरु आहेत. काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. एकूण मिळून ६३ टक्के कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत.

काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत शहर विभागातील नेपियन सी रस्ता या महत्त्वपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची एकूण लांबी १९५० मीटर आहे. त्यात पुलाचा २०० मीटर भाग समाविष्ट आहे. त्यापैकी १,७५० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान ७७० मीटर लांब व २७.४५ मीटर रुंद रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मंगळवारी १७ फेब्रुवारी २०२६ पासून या कामास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण कार्यवाहीचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांनी या रस्ते कामाचा आढावा घेतला. स्थानिक भाजपचे नगरसेवक अजय पाटील, सनी सानप, स्नेहल तेंडुलकर, गौरंग झवेरी यांच्यासह उपप्रमुख अभियंता (रस्ते) (शहर) डॉ. विशाल ठोंबरे, सहायक अभियंता हुलावळे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे आदी या बैठकीस उपस्थित होते.

रस्ते काँक्रिटीकरण कालावधीत नागरिकांना तात्पुरते वाहतूक बदल, अंशतः रस्ता बंद तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय कमी व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या कालावधीत महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. कामाच्या ठिकाणी दिलेल्या वाहतूक व सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका डि विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >