महापालिका सभागृहात महायुतीचे वर्चस्व
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या महापौर पदासाठी शिवसेनेच्या वतीने नगरसेविका हर्षाली चौधरी थवील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या वतीने नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नरेंद्र सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून असून, नव्या महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कडोंमपा निवडणुकीमधून नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांपैकी एकाची महापौर पदी, तर दुसऱ्याची उपमहापौरपदी निवड करण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी जिल्हा अधिकारी मुंबई शहर आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.