शीव उड्डाणपूल येत्या पावसाळ्यात होणार वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व - पश्चिम आवागमनासाठी पादचारी पूल कार्यान्वित करण्‍यात आला आहे. दोन भूयारी पादचारी मार्गांपैकी एक भूयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्‍या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्‍यात येईल. याच पद्धतीने महानगरपालिका आणि रेल्‍वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतरपद्धतीने करावीत. प्रकल्‍पाच्‍या कालमर्यादेचे पालन करावे. यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनासमवेत उच्‍च प्रतीचा समन्वय साधावा. कामाचे सुयोग्य व सुक्ष्‍म नियोजन करावे, अभियंत्यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत. १५ जुलै २०२६ पर्यंत शीव उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असेही बांगर यांनी स्पष्‍ट केले.


शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्‍प स्‍थळाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी पाहणी केली. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळ्ये तसेच मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते


शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग , दोन पादचारी भुयारी मार्ग आदींचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्‍यानंतर रेल्‍वे पुलाच्‍या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करावी. पश्चिमेकडील अधिकाधिक भाग कामासाठी उपलब्‍ध व्‍हावा, असे नियोजन करावे. पश्चिमेकडील कामाचे ४ टप्‍पे असून या चारही टप्‍प्‍यांच्‍या पूर्णत्‍वाचे सूक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले. तसेच, त्‍यांची कालमर्यादा निश्चित करण्‍यात आली. एकंदरीतच, पश्चिम बाजूची सर्व कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्‍वे प्रशासनाकडून ३१ मे २०२६ पर्यंत पूर्व बाजूचा पोहोच रस्‍त्‍याचा ताबा महानगरपालिकेला मिळणे अपेक्षित असल्‍याने उर्वरित कामे पूर्ण करण्‍यासाठी त्‍यानंतर आणखी काही कालावधी आवश्‍यक आहे. त्‍याचा विचार करता या पुलाची सर्व कामे १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील व पूल वाहतुकीस खुला केला जाईल, असेही बांगर यांनी नमूद केले.


धारावी बाजूकडील दुस-या भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. रेल्वे रूळावरील जुन्‍या पुलाच्‍या उत्‍तरेकडील भागाचे निष्‍कासन करण्‍यात आले आहे. आता दक्षिणेकडील भागाचे पाडकाम सुरू आहे. उत्तर दिशेच्या अर्ध्या बाजूवर तुळया स्थापित केल्यावर पूर्व बाजूचा अर्धा पोहोच रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यात येईल. रेल्वे प्रशासनामार्फत शेवटची तुळई स्थापित करण्याची कार्यवाही ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. तोपर्यंत महानगरपालिकेमार्फत पश्चिम बाजूची सर्व कामे केली जातील. मात्र, पूर्व बाजूची कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजेच १५ जुलै २०२६ पूर्वी या उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. अभियंते, अधिकारी यांनी दररोज कार्यस्थळी उपस्थित राहावे. उद्भवणाऱ्या अडीअडचणींचा त्याच वेळी, त्याच ठिकाणी निपटारा करावा, असे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले.


या संपूर्ण कार्यवाहीमध्ये ठरविलेल्या कालमर्यादेत तुळया कार्यस्थळी उपलब्ध होणे महत्वाचे आहे. एकंदरीत, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने परस्पर समन्वय साधून प्रामाणिकपणे काम करावे, जेणेकरून नागरिकांची असुविधा लवकरात लवकर दूर होईल, असेही बांगर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मराठी शाळांबाबतच्या धोरणाविषयी काय म्हणाली मुंबई महापालिका ?

मराठी शाळांबाबत चुकीची माहिती; महापालिका प्रशासनाने मराठी अभ्यास केंद्राच्या शिष्टमंडळासमोर मांडली

तब्बल ४६ वर्षांनंतर भांडुप संकुला २००० दलशक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प येत्या एप्रिल २०२९ पर्यंत होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई :  भांडुप संकुल येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत २,००० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अनधिकृतपणे जाहिरात फलक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी संरचना उभारुन

मुंबईकरांसाठी बीडीडी घरांची मोठी सोडत; वरळी आणि नायगाव मध्ये सर्वाधिक घरांचे वितरण

मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ

गृहविभागाच्या अपर मुख्य सचिव पदी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

मुंबई : राज्याच्या गृहविभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला असून सनदी अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर

कूपर रुग्णालय परिसरातील २०० फेरीवाल्यांच्या वाढीव बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अंधेरी (पश्चिम) येथील राम गणेश गडकरी मार्ग (इर्ला मार्ग) परिसरातील सुमारे २०० अनधिकृत