आता १० मिनिटांत औषधं दारात!
नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आयुष औषधं आणि वेलनेस औषधं सहज उपलब्ध व्हावी यासाठी आयुष मंत्रालयाने झेप्टो या क्विक-कॉमर्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक उपचारपद्धतींची उत्पादने ऑनलाइन माध्यमातून अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असून गुणवत्ता आणि नियमपालन यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या करारानुसार आयुष मंत्रालयाच्या निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या मदतीने झेप्टोच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयुष औषधे आणि आरोग्यवर्धक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. झेप्टो कमी वेळेत वस्तू घरपोच पोहोचवते, त्यामुळे गरज असताना लोकांना औषधे लवकर मिळू शकतील. याबद्दल व्हिडिओ मेसेजिंगद्वारे बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्समुळे विश्वासार्ह आरोग्य उत्पादने थेट लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. झेप्टोसारख्या डिजिटल डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममुळे भारताची जुनी आयुष परंपरा आधुनिक आणि पारदर्शक वितरण व्यवस्थेशी जोडली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
जाधव यांनी सांगितले की, हे सहकार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक डिजिटल सुविधांशी जोडण्याच्या विचाराशी जुळणारे आहे. यामुळे नागरिकांना योग्य आणि माहिती असलेले पर्याय मिळतील. तसेच आयुष उत्पादकांसाठी नव्या बाजारपेठा खुल्या होतील. गुणवत्ता, सुरक्षितता आणि नियमांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा करार आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आयुष निर्यात प्रोत्साहन परिषद (AYUSHEXCIL) चे अध्यक्ष अनुराग शर्मा आणि झेप्टोचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कैवल्य वोहरा हेही यावेळी उपस्थित होते. या वेळी अनुराग शर्मा म्हणाले की, या करारामुळे लहान आणि मध्यम उद्योगांना ऑनलाइन बाजारात पोहोचण्याची संधी मिळणार आहे. ठरवलेले गुणवत्ता निकष आणि नियम पाळणाऱ्या उत्पादकांचीच निवड केली जाईल. त्यामुळे आयुष उत्पादनांवरील लोकांचा विश्वास टिकून राहील. यावेळी वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले की, आयुष औषधांचा दर्जा चांगला असणे, ती सुरक्षित असणे आणि सर्व नियम पाळले जाणे हे मंत्रालयासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सहकार्यामुळे औषधांची तपासणी अधिक काटेकोर होईल. तसेच आयुष उपचारपद्धतींबाबत योग्य आणि शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.