मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आधुनिक ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजीविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या दर्जेदार संधी उपलब्ध होतील, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देण्यात आली. या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचाही समावेश केला जाणार आहे. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांतील तफावत दूर करण्यासाठी आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
केंद्र आणि राज्य सरकार करणार २४२ कोटींचा खर्च
पीएम-सेतू योजनेंतर्गत आयटीआयचे आधुनिकीकरण ‘हब अँड स्पोक’ प्रारूपात करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार मिळून सुमारे २४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के, राज्य सरकारचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के असा निधी वाटा असेल. एका क्लस्टरसाठी (एक हब आयटीआय व चार स्पोक आयटीआय) पाच वर्षांसाठी अंदाजे २४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी केंद्र सरकारचा ११२ कोटी, राज्य शासनाचा ९८ कोटी आणि उद्योग क्षेत्राचा ३१ कोटी रुपयांचा सहभाग असेल. राज्य शासनाकडून पाच वर्षांसाठी करावयाच्या ९८ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे.
असा असेल पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात नागपूर येथील शासकीय आयटीआयचे हब म्हणून आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये नागपूर येथील मुलींचे आयटीआय तसेच कामठी, हिंगणा आणि बुटीबोरी येथील आयटीआयचा समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर येथे आयटीआय हब विकसित करण्यात येणार असून, पैठण, खुलताबाद, गंगापूर आणि फुलंब्री येथील आयटीआयचेही आधुनिकीकरण केले जाईल. पुणे जिल्ह्यात औंध येथील आयटीआय हब म्हणून विकसित करण्यात येणार असून, औंध येथील मुलींचे आयटीआय, खेड-राजगुरुनगर आणि मुळशी येथील आयटीआयचा त्यात समावेश असेल.
नवीन अभ्यासक्रम सुरू करणार
एका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणीसुधारणा केली जाईल. स्पोक आयटीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील आणि आठ विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा करण्यात येणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या भागांत सेवा क्षेत्र, बहुकौशल्य आणि उपजीविका आधारित अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
भारताची गुरुकुल परंपरा, नालंदासारखी विद्यापीठे आणि आर्यभट्टांसारखे विद्वान यांमुळे देश ज्ञानार्जनाचे जागतिक केंद्र ठरला होता. त्याच ज्ञानपरंपरेला आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड देत आयटीआयच्या माध्यमातून ‘नवा भारत’ घडवण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.