वेंगुर्ले :रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रीतेश राऊळ यांना अपक्ष उमेदवार केरवाडी येथील काशिनाथ नार्वेकर यांनी पाठिंबा जाहीर केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जात आहेत. यातच वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचे नार्वेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नव्हता. दरम्यान शिवसेनेचे नेते, आमदार दीपक केसरकर यांच्या बरोबर बोलणे झाल्यानंतर त्यांच्या शब्दाचा मान ठेवत आपण महायुतीचे उमेदवार प्रितेश राऊळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, असे जाहीर केले. यामुळे रेडी मतदारसंघातील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिव वालावलकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षांतर्गत समन्वय साधला गेला आणि महायुतीची ताकद अधिक बळकट झाली. महायुतीच्या या निर्णयामुळे रेडी मतदारसंघात शिवसेना, भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले असून या निवडणुकीत महायुतीला याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर या घडामोडींची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला वेग आला आहे.