सोलापूर : बहिणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे या गोष्टीचा राग मनात ठेवून आपल्याच बहिणीच्या पतीला भावाने संपवल्याची घटना बार्शी तालुक्यात झाली आहे. बहिणीच्या पतीला बार्शी येथील हॅाटेलमध्ये जेवायला बोलावुन घेऊन व हॅाटेलमध्ये दारु पिताना झालेल्या वादातून बहिणीच्या पतीवर दारुची बॅाटल फोडून व गळ्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हि घटना बार्शी तालुक्यातील पांगरी येथे बुधवारी २८ जानेवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.
नक्की घडलं काय ?
सुशील क्षीरसागर (वय २६, रा. अरणगाव, ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुशील व रेश्मा यांचा वर्षभरापूर्वी कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह झाला होता. या विवाहाचा राग रेश्माचा भाऊ ऋषिकेश याच्या मनात होता. सुशील वाहनचालक म्हणून काम करत होता, तर रेश्मा पुण्यातील एका खासगी दवाखान्यात कार्यरत होती. दोघे पुण्यात वास्तव्यास होते. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यात आले होते. २८ जानेवारी रोजी ऋषिकेशने “सगळे मिळून हॉटेलवर जेवायला जाऊ” असे सांगून सुशील, रेश्मा, स्वतःची मैत्रीण काजल मिसाळ आणि मामा मच्छिंद्र चव्हाण यांना पांगरी येथील हॉटेल शिवनेरी येथे नेले. जेवणादरम्यान रेश्माच्या लग्नावरून “आपले आडनाव एकच असूनही हे लग्न कसे केले?” असा सवाल ऋषिकेशने केला. यावरून सुशील आणि ऋषिकेशमध्ये वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर ऋषिकेशने हातातील दारूची काचेची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत बहिणीसमोरच तिच्या पतीचा जीव गेला असून, एका क्षणात तिचे कुंकू पुसले गेले. या प्रकरणी वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ऋषिकेशला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.