सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी १० फेब्रुवारीस बारावीची परीक्षा, तर शुक्रवारी २० फेब्रुवारीस दहावीची परीक्षा होणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सज्ज झाले. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यावेळी उपस्थित होत्या.
परीक्षा काळात रायगड जिल्ह्यात १५+१ परिरक्षण केंद्रांची संख्या राहणार, उच्च माध्यमिक परीक्षेसाठी ५२, तर माध्यमिक परीक्षेसाठी ७५ परिक्षा केंद्र आहे. बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार १२१, तर दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३७ हजार ५७९ एवढी आहे. प्रत्येक तालुक्यासाठी तालुका स्तरावर एक पथक नियुक्त करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण नऊ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून, यामध्ये विभागस्तर, जिल्हास्तर, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथामिक), शिक्षणाधिकारी (योजना), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), विशेष महिला भरारी पथकाचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती गठित करण्यात आली असून, जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नसेल. शंभर टक्के विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र प्रवेशावेळी शाळेतील कर्मचाऱ्यांमार्फत झडती होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर मुलींच्या कॉपी तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा शाळेच्या महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हिडीओ रेकॉडींग करण्याच्या सुचनाही केंद्र संचालकांना देण्यात आल्या. संवेदनशील केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक असून, परिक्षा केंद्रावर परीक्षेआधी एक तास व परीक्षेनंतर एक तास हे बैठे पथक असेल. कोणीही कॉपी करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाणार. तोतया विदयार्थी परीक्षेस बसल्याचे आढळल्यास त्यास पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येण्याबरोबरच फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार. परीक्षार्थ्यांने परिक्षेपूर्वी अगर ऐनवेळी खोटे प्रतिज्ञापत्र, हमीपत्र, अपघाताचा, अपंगत्वाचा वैदयकिय दाखला केंद्र संचालकांकडे सादर करुन सवलत घेतल्यास किंवा केंद्र बदलून प्रविष्ठ झाल्यास परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. दरम्यान, सर्व पालकांनी 'कॉपीमुक्त अभियान' बाबतची नोंद घेऊन आपल्या मुलांना समुपदेशन करण्याबरोबरच सर्व विदयार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास आधी पोहचायचे आहे. जिल्हयातील पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन हे 'कॉपीमुक्त अभियान' सफल करायचे असून, या अभियानामध्ये पालकांनीही सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी जावळे यांनी पालकांना केले आहे.