मुंबई : राजकारणातील आक्रमक चेहरा ते सामान्यांचा 'हक्काचा दादा' असा अजित पवार (Ajit Pawar) यांचा प्रवास एका वळणावर येऊन थांबला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या कार्यशैलीत आणि प्रतिमेत केलेला बदल हा राज्यासाठी कौतुकाचा विषय ठरला होता. केवळ सत्तेचे राजकारण न करता, लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज त्यांच्या आठवणींना अधिक गडद करत आहे. अजित पवार यांनी अलीकडच्या काळात महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले होते. या नव्या नात्याचे प्रतीक म्हणून त्यांनी स्वीकारलेला 'गुलाबी रंग' हा केवळ कपड्यांपुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या मृदू आणि सर्वसमावेशक प्रतिमेचा भाग बनला होता. राजकीय डावपेचांपलीकडे जाऊन त्यांनी स्वीकारलेली ही नवीन 'इमेज' आज त्यांच्या निधनानंतर समर्थकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. रणनीती बदलून जनतेच्या अधिक जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आपल्या लाडक्या नेत्याची ही 'गुलाबी स्वप्नं' आणि विकासाची धडाडी आता केवळ आठवणींच्या रूपात जनतेच्या मनात जिवंत राहणार आहे.
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती ...
'गुलाबी जॅकेट' अन् दादांची आपुलकी
लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारलेला हा प्रेमाचा आणि आपुलकीचा रंग दादांनी केवळ पक्षापुरता मर्यादित न ठेवता स्वतःच्या जगण्यातही उतरवला होता. जनतेशी नातं जोडण्यासाठी त्यांनी १८ खास गुलाबी आणि किरमिझी रंगाची जॅकेट तयार करून घेतली होती. शासकीय बैठकांपासून ते जाहीर सभांपर्यंत दादांचा हा नवा 'लूक' राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. विरोधकांनी त्यांच्या या रंगावरून वारंवार टीका केली, मात्र अजित दादांनी कधीही राग न व्यक्त करता आपल्या खास विनोदी शैलीत विरोधकांना उत्तर देऊन या रंगामागची प्रेमाची भावना अधोरेखित केली. महिला आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी 'डिझाइन बॉक्स्ड'च्या सल्ल्यानुसार त्यांनी ही नवी इमेज स्वीकारली होती. आज त्यांच्या निधनानंतर, त्यांनी आपल्या संवादशैलीत आणलेला तो मृदूपणा आणि ती १८ गुलाबी जॅकेट्स त्यांच्या समर्थकांसाठी केवळ आठवणींचा ठेवा बनून राहिली आहेत
'लाडकी बहीण' आणि गुलाबी क्रांतीचा शिल्पकार हरपला
अजित दादांनी केवळ कपड्यांचा रंग बदलला नव्हता, तर त्यामागे महिला आणि मुलींच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक मोठी राजकीय रणनीती होती. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून त्यांनी घराघरात गुलाबी रंग पोहोचवला होता. अजित दादांनी हा गुलाबी रंग केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता, आपल्या पक्षातील सर्व मंत्री आणि आमदारांनाही तो स्वीकारण्याचा आग्रह धरला होता. पारंपारिक निळ्या-पांढऱ्या रंगाऐवजी पक्षाचे बॅनर, जाहिराती आणि सोशल मीडिया सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर करून त्यांनी एक नवा ब्रँड निर्माण केला होता. महिला वर्गाचे लक्ष वेधून घेण्यात ही रणनीती अत्यंत यशस्वी ठरली होती. अर्थसंकल्पातील महिलांसाठीच्या विशेष तरतुदी असोत किंवा 'लाडकी बहीण' योजनेचा राज्यव्यापी प्रचार, दादांनी या गुलाबी रंगाच्या माध्यमातून महिलांशी भावनिक नाते जोडले होते. आज त्यांच्या निधनानंतर, या गुलाबी क्रांतीच्या आठवणी आणि त्यांनी भगिनींसाठी आखलेल्या योजना राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहतील.
टीकाकारांना निकालातून उत्तर देणारा झंझावात
ज्या गुलाबी रंगाच्या रणनीतीवर राजकीय विश्लेषकांनी सुरुवातीला टीका केली होती, त्याच रणनीतीने दादांनी विधानसभा निवडणुकीत ४१ आमदार निवडून आणून स्वतःचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते. अजित दादांनी केवळ रंगाचा बदल केला नव्हता, तर त्या माध्यमातून महिला मतदारांशी थेट नातं जोडलं होतं. विरोधकांनी आणि विश्लेषकांनी या प्रयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना, दादांनी निकालांमधून आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या या 'गुलाबी झंझावाता'ने राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठे यश मिळवून दिले, जे राजकारणातील अभ्यासाचा विषय ठरले. अनंतात मंत्रालयातील महत्त्वाच्या बैठका असोत किंवा मैदानावरील भव्य सभा, अजित दादांचा तो गुलाबी वावर आता पुन्हा दिसणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 'गुलाबी प्रयोग' आणि त्यातून मिळवलेले यश हा अजित पवारांच्या नावावर असलेला एक वेगळा आणि सुवर्ण अध्याय म्हणून सदैव ओळखला जाईल. रणनीतीकार म्हणून त्यांचा हा शेवटचा मास्टरस्ट्रोक राज्यासाठी कायम स्मरणात राहील.