“लाडक्या बहिणींच्या ताकदीवर 232 आमदार निवडून आणण्याचा इतिहास रचला; त्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली!”
“बोंडारवाडी धरण होणारच; आडवा कोण येतो ते बघतो!”
केळघर-मेढ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा
सातारा, ता. : बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमान आणि विचार सोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच मी छातीचा कोट करून राज्यात सत्तांतर घडवून आणले आणि बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात स्थापन केले, असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.
सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, महिला आणि गोरगरिबांसाठी सातत्याने काम करत असल्यामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सातारा जिल्ह्यातील केळघर-मेढा येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला ‘लाडक्या बहिणीं’सह हजारो नागरिकांची उस्फूर्त उपस्थिती होती. कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटल्याबद्दल शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महायुतीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करताना शिंदे म्हणाले, “ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर विकास, स्वाभिमान आणि बाळासाहेबांच्या विचारांची आहे.”
नोकरी आणि रोजगारासाठी तरुणांचे मुंबई, पुणे, ठाणे, वसई, नालासोपारा यांसारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याचा निर्धार मी केला आहे, असे ठणकावून शिंदे म्हणाले. “या भूमीतच रोजगार निर्माण करणार, ही माझी गॅरंटी आहे,” असा शब्द त्यांनी दिला.
“बोंडारवाडी धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच. आडवा कोण येतो ते मी बघतो,” असा सज्जड इशारा देत शिंदे यांनी स्पष्ट केले. या धरणामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि जिल्ह्यात हजारो रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“लाडकी बहीण योजना फसवी आहे, निवडणूक जुमला आहे, असे म्हणणारे कोर्टात गेले आणि फटकारले गेले. पण मी शब्द देतो ही योजना कधीही बंद होणार नाही. दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणारच,” असा ठाम शब्द शिंदे यांनी दिला.
“15,00 रुपये असो वा 21,00 रुपये आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार. योग्य वेळी योग्य निर्णय होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“महिलांनी विधानसभेत विरोधकांचा असमान दाखवले. 232 आमदार निवडून आणले. महाराष्ट्राच्या इतिहासात हा चमत्कार आहे. विरोधकांना विरोधी पक्षनेताही मिळू दिला नाही,” असा टोला शिंदे यांनी लगावला.
एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सरकारने 100 टक्के शिक्षण फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याची आठवण करून देताना शिंदे म्हणाले, “सरकार जर सर्वसामान्यांसाठी नसेल, तर त्याचा उपयोग काय?”
शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांन व्यतिरिक्त राज्य सरकारनेही 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचे कामही सरकार करत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षांत केवळ चार सिंचन प्रकल्प मंजूर झाले, तर शिंदे सरकारने अवघ्या अडीच वर्षांत 180 प्रकल्प मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला.
महाबळेश्वर, तापोळा, केळघर, मेढा, प्रतापगड परिसरात नवीन रस्ते, पूल आणि पर्यटन मार्ग विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतापगडाच्या विकासासाठी 27 कोटी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
केळघर-मेढा, जावळी खोरे, प्रतापगड परिसरात इको-टुरिझम, अॅग्रो-टुरिझम, होम-स्टे, फार्म-स्टे आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
साताऱ्यात 100 खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्याची घोषणा करतानाच, महिला बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पापड, लोणची, बांबू उत्पादने यांसारख्या ग्रामीण उत्पादनांचे ब्रँडिंग करून महिलांना उद्योजक बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“मी निवडणुकीपुरता नेता नाही. मी कायम तुमच्यासोबत आहे. जो शब्द देतो, तो पाळतो. बाळासाहेब आणि आनंद दिघेसाहेबांनी मला हेच शिकवले आहे,” असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर टीकेचा भडिमार केला.
“पाच तारखेला धनुष्यबाण आणि महायुतीच्या निशाणीवर बटन दाबा. तुमचं मत म्हणजे विकासाला मत, तुमचं मत म्हणजे लाडक्या बहिणींच्या सन्मानाला मत,” असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा शेवट केला.
यावेळी माजी आमदार दगडूदादा सकपाळ, अंकुश कदम, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, माजी सभापती बापुराव पार्ते, एकनाथ ओंबळे, सविता ओंबळे, संदीप पवार, अतिश कदम, विठ्ठल गोळे, शिल्पा शिंदे, शशिकांत शिंदे, रेश्मा जगताप सर्व नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक,
शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, उमेदवार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....