वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलत्या धोरणामुळे आणि अव्यावहारिक अशा निर्णयांमुळे अमेरिका - भारत मुक्त व्यापार करारात अडथळे निर्माण झाले आहेत. हा करार अद्याप न होण्याचे मुख्य कारण ट्रम्प आणि प्रशासनातील त्यांचे निवडक सहकारी हेच आहेत, असा आरोप अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केला आहे.
टॅरिफ लादल्यामुळे अमेरिकेच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही पण महागाई वाढली आहे. आधी परदेशातून मोठ्या प्रमाणात येणारी आणि वाजवी दरात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने आणि सेवा आता अनुपलब्ध आहे किंवा त्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शिवाय या उत्पदनांचा अथवा सेवांचा लाभ घेण्यासाठी आधीच्या तुलनेत जास्त रक्कम मोजण्याची वेळ अमेरिकेत राहणाऱ्यांवरच आली आहे. टॅरिफ अर्थात आयातशुल्क या संदर्भातले ट्रम्प यांचे धोरण इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेसाठीच जास्त त्रासाचे ठरल्याचा आरोप विरोधकांकडून ट्रम्पवर सुरू आहे. आता अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केलेल्या नव्या आरोपांची त्यात भर पडली आहे.
'अमेरिका प्रथम' हे धोरण राबवताना व्यवस्थित विचार केला नाही, चुकीचे निर्णय घेतले आणि राबवले. यामुळे अमेरिकेचे भले होण्याऐवजी अमेरिकाच अडचणींमध्ये सापडली आहे. अमेरिकेसाठी महत्त्वाचा असलेला भारतासोबतचा मुक्त व्यापार करार अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाच्या चुकांमुळेच रखडला आहे, असा आरोप अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केला आहे.
अमेरिका - भारत मुक्त व्यापार करार रखडण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जेडी व्हान्स आणि पीटर नव्हारो हे सर्वाधिक जबाबदार आहेत, असा आरोप अमेरिकन सिनेटर टेड क्रुझ यांनी केला आहे.
सिनेटर क्रुझ त्यांच्या निवडक बड्या निधी पुरवठादारांशी फोनवर खासगी संभाषण करत होते. या संभाषणात क्रुझ यांनी अमेरिका - भारत मुक्त व्यापार करार रखडण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जेडी व्हान्स आणि पीटर नव्हारो हे सर्वाधिक जबाबदार असल्याचा आरोप केला. हा खासगी संवाद रेकॉर्डेड स्वरुपात लीक झाला आहे. लीक झालेल्या ऑडिओ क्लीपमुळे अमेरिकेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ज्या माध्यमांनी सिनेटर क्रुझ यांच्या ऑडिओ क्लिप लीक झाल्याचे वृत्त दिले त्यांनी आवाजाची सत्यता पडताळणी अद्याप झालेली नाही असे सांगितले. पण क्लिप ऐकल्यावर अनेकांनी आवाज ओळखला, असेही वृत्त संबंधित माध्यमांनी दिले आहे.
ट्रम्प यांच्या चुकांमुळे मिडटर्म इलेक्शन अर्थात मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव होण्याची शक्यता वाढली आहे, अशी भीती सिनेटर क्रुझ यांनी बड्या निधी पुरवठादारांशी बोलताना व्यक्त केली आहे.