मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे कारण अद्याप समजलेले नाही. पण तो काही दिवसांपासून आजारी होता आणि या आजारपणातच त्याने अखेरचा श्वास घेतला. प्रथमेशच्या मित्रांनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्याच्या निधनाची बातमी दिली.
काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर प्रथमेशवर कुटुंबाची जबाबदारी आली. प्रथमेशने घराची जबाबदारी सांभाळलीच. याशिवाय या दुःखावर मात करत त्याच्या आईलाही धीर दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम हे दोघे एकत्र रील करत होते. ही रील सोशल मीडियात व्हायरल होत होती. प्रथमेशचे कौतुक होत होते. अचानक त्याच्या निधनाची बातमी आल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
प्रथमेशचा मित्र तन्मय पाटेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन लिहिलंय की, ''तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे ! खूप आठवण येईल तुझी Miss You Bhai''. साधा, प्रेमळ स्वभाव आणि डान्सच्या टॅलेंटमुळे प्रथमेश कदमने अल्पावधीत सर्वांचं मन जिंकलं. आधी पती आणि आता मुलाचं छत्र हरपल्याने प्रथमेशच्या आईवर शोककळा पसरली आहे. प्रथमेशचे मित्र आणि चाहते या कठीण प्रसंगात प्रथमेशच्या आईच्या दुःखात सहभागी आहेत.