नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्रातून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी केंद्राने २६९६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तूर खरेदी ही मूल्य समर्थन योजनेंतर्गत किमान आधारभूत किमतीनुसार होणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल आणि थेट खरेदीमुळे दलालांचा त्रासही संपणार आहे. पारदर्शक खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवण्याचे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे विपणन अर्थात मार्केटिंग विभागाचे मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. त्यांनी राज्यातील तूर उत्पादनाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. तसेच बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांशी खरेदी प्रक्रियेच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
केंद्राच्या निर्णयानुसार तूर खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ या दोन केंद्रीय संस्था महाराष्ट्र शासनाशी समन्वय राखून करतील. गरज पडल्यास खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देशही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.