इतर एअरलाईनला संधी
नवी दिल्ली : डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या उड्डाण गोंधळानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईनवर कारवाई केली आहे. प्रवाशांच्या मोठ्या गैरसोयीची दखल घेत डीजीसीएने इंडिगोचे हिवाळी वेळापत्रक १० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले असून, त्यामुळे एअरलाईनला काही सेवा रद्द कराव्या लागल्या आहेत. या निर्णयानुसार इंडिगोने मंत्रालयाकडे ७१७ रिकाम्या स्लॉटची यादी सादर केली आहे.
मागील वर्षी ३ ते ५ डिसेंबरदरम्यान इंडिगोची अंदाजे अडीच हजारांहून अधिक उड्डाणे रद्द झाली होती, तर जवळपास दोन हजार उड्डाणांना विलंब झाला होता. यामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना विमानतळांवर तासंतास वाट पाहावी लागली आणि मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या गंभीर व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने ही कठोर कारवाई केली.
स्लॉट म्हणजे विमानाला विमानतळावर उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी दिलेला निश्चित वेळ असतो. इंडिगोने रिकामे केलेल्या ७१७ स्लॉटपैकी ३६४ स्लॉट दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूरु आणि हैदराबाद या सहा प्रमुख मेट्रो विमानतळांवर आहेत. यामध्ये हैदराबाद आणि बंगळूरु येथे सर्वाधिक स्लॉट उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हे स्लॉट जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी रिकामे करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाने तात्काळ हालचाली सुरू करत इतर विमान कंपन्यांकडून या स्लॉटसाठी अर्ज मागवले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि हवाई सेवा सुरळीत ठेवण्यासाठी इतर एअरलाईन्सनी या रिकाम्या स्लॉटचा वापर करावा, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात काही मार्गांवर इतर विमान कंपन्यांच्या अतिरिक्त उड्डाणांची शक्यता निर्माण झाली आहे.