६६ नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (२५ जाने.)भाजपचे नवी मुंबईतील ६६ नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे उद्याच महापौरपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या ३६ महिला नगरसेविकांची प्राथमिक चाचपणी करण्यात आली असून त्यातून ११ नगरसेविकांची निवडक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील एका नावावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्थानिक भाजप कमिटीने नऊ महिला नगरसेविकांची यादी तयार केली असून, त्यामध्ये आणखी दोन नावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीत एकूण ११महिला नगरसेविका असतील. रविवारी ही यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे.
महापौरपदाचे दावेदार:
महापौरपदाच्या शर्यतीत रेखा म्हात्रे, सलूजा सुतार, अदिती नाईक, अंजनी भोईर, दयावती शेवाळे, नेत्रा शिर्के, वैष्णवी नाईक, शुभांगी पाटील, ॲड. भारती पाटील आणि माधुरी सुतार ही नावे आघाडीवर आहेत.
महापौर सागर नाईक यांची गटनेतेपदी निवड: शुक्रवारी नवी मुंबईतील भाजपच्या ६६ नगरसेवकांनी गट स्थापन करून कोकण भवन येथे अधिकृत नोंदणी केली. यावेळी माजी महापौर सागर नाईक यांची सर्वसंमतीने गटनेतेपदी निवड करण्यात आली. उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक यांच्यात महापौरपदाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत स्थानिक नेत्यांनी केलेल्या चाचपणीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
माधुरी सुतार यांच्या नावाची शिफारस?
दरम्यान, नवी मुंबई महापौरपदासाठी माधुरी सुतार यांच्या नावाची शिफारस भाजपकडून प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिरवणे गावातून त्या नगरसेविका असून, यापूर्वी त्या भाजप महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास महापौरपदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.