ठाणे : ‘कैसा हराया’ म्हणत मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.तसेच शेख यांनी केलेले “हम मुंब्रा को हरा बना देंगे” हे विधान चांगलेच चर्चेत राहिले. या विधानाच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे. पोलिसांनी सहर शेख यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेखी माफीनामा घेतला. ‘कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता’, असे सहर शेख यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. मुंब्रा पोलिसांनी माझ्या तक्रारीनंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुराव्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात दिली” असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
सहर शेख यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे. यामध्ये त्यांनी मुंब्रा येथे झालेल्या सभेत “हम मुंब्रा को हरा बना देंगे” असे भाषण केले होते. पण हे वाक्य पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोलल्याचे सांगितले.“कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू. वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते” असे सहर शेख यांनी आपल्या लेखी जबाबात लिहून दिले आहे.