भाजप जिल्हाध्यक्ष राजपूत यांची स्वीकृत आणि स्थायी समिती सदस्यपदी निवड
गणेश पाटील पालघर : डहाणू नगर परिषदेच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत २७ पैकी १७ जागा जिंकून भाजपने येथे स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भरत राजपूत यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर झालेल्या घडामोडीत भरत राजपूत यांचे बंधू जगदीश राजपूत हे उपनगराध्यक्ष पदी विराजमान झाले असून, भरत राजपूत हे स्वतः नगर परिषदेत स्वीकृत सदस्य आणि आता स्थायी समिती सदस्य म्हणून निवडल्या गेले आहेत. विविध विषय समित्यांचे सहा सभापती सुद्धा भाजपचेच निवडल्या गेले आहेत. त्यामुळे डहाणू नगर परिषदेत नगराध्यक्ष पद जरी भाजपकडे नसले तरी, बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा या ठिकाणी भरत 'राज' पाहावयास मिळणार असल्याचे चित्र आहे.
डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार गट असे सर्व पक्ष एकत्र मोट बांधून लढले. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे भरत राजपूत हे पराभूत झाले. तर शिवसेनेचे राजीव माच्छी हे जिंकले; परंतु बहुमताचा आकडा भाजपने गाठला. २७ सदस्यांपैकी १७ नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ आणि शिवसेनेचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. दरम्यान, बहुमत असल्याने भाजपने त्यानंतरच्या सर्व घडामोडीत नगर परिषदेमध्ये पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भरत राजपूत यांचे बंधू जगदीश राजपूत विजयी झाले.
नुकत्याच झालेल्या विविध विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सहाही जागांवर भाजपचेच सभापती बिनविरोध विराजमान झाले आहेत. तसेच सर्वप्रथम स्वीकृत सदस्य म्हणून निवडल्या गेलेले भरत राजपूत यांची नगरपरिषदेच्या स्थायी समितीवर सुद्धा निवड करण्यात आली आहे. डहाणू नगर परिषदेच्या नियोजन समिती सभापती पदी उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांची निवड करण्यात आली. तर बांधकाम समिती सभापती विशाल नांदलस्कर ,पाणीपुरवठा समिती सभापती प्रदीप चाफेकर, आरोग्य समिती सभापती विक्रम नायक, शिक्षण समिती सभापती शैलेश राकामुथा आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदी युगाली पाटील हे सर्व भाजपचे पदाधिकारी विराजमान झाले आहेत. दरम्यान सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषद कार्यालयाचे स्थानांतरण आणि डहाणू महोत्सव या दोन विषयावर चर्चा करण्यात आली. या दोन्ही विषयांना आमचा मुळात कोणताही विरोध नाही. मात्र हे विषय थेट सभागृहात आणण्याआधी डहाणू नगर परिषदेने योग्य नियोजन करूनच ते सभागृहासमोर आणायला पाहिजे होते अशी भूमिका भाजपने मांडली. तसेच डहाणू महोत्सव पुढच्या महिन्यात घेण्याच्या प्रस्तावावर बोलताना भरत राजपूत यांनी सांगितले की. फेब्रुवारीमध्ये बारावीच्या परीक्षा व त्यानंतर दहावीच्या परीक्षा सुरू होतात, अशा परिस्थितीत फेब्रुवारीत डहाणू फेस्टिव्हल घेणे व्यवहार्य नाही. त्यामुळे डहाणू महोत्सवाचा विषय पुढे सरकला नाही. निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या कामांची देयके काढण्याबाबत नगराध्यक्ष आणि विरोधी सदस्यांमध्ये वातावरण तापले होते. मात्र मिहिर शहा आणि मुख्याधिकारी अक्षय गुडघे यांनी मध्यस्थी करत हा वाद वाढू दिला नाही. एकंदरीतच भाजपकडे सहा सभापती एक उपनगराध्यक्ष आणि बहुमताचा आकडा असल्याने आणि यांच्या विरोधकांकडे नगराध्यक्ष पद असल्याने इथून पुढे डहाणू नगरपरिषदेत अनेक विषय वादग्रस्त ठरणार असल्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे डहाणू नगर परिषदेत बहुमत असल्याने अनेक बाबतीत भाजपचे म्हणजेच पर्यायाने भरत "राज" चालणार असल्याचे दिसून येत आहे.