जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात १० ते १५ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, आज १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील सरस्वती भुवन व शनी मंदिर परिसरात तसेच काली मशीद परिसरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या काही मतदारांवर व नागरिकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. एकामागून एक नागरिकांवर हल्ला करत या कुत्र्याने अनेकांना चावा घेतला. काही जणांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून एका व्यक्तीच्या हाताची करंगळी तुटल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये शिवराज गणेश वेव्हारे, शेख मोबीन, तारेख सुबानी, कृष्णा सुपारकर, नासेर चाऊस, राजश्री कसबे, शेख रीहान, सैय्यद सलादीन, अमिनोदिन शेख, मोहसिन कुरेशी, आसिफ कुरेशी, संगीता अशोक साळवे, स्नेहा श्रीनिवास येमुल, शेख अतिक आदी नागरिकांचा समावेश आहे.
या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, एकूण १५ जणांना कुत्र्याने चावा घेतला असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची अधिकृत माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आशिष देवडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.