लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा
नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या कोणत्याही साहसाला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सुरू केलेले 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच आहे," अशा कडक शब्दांत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरवेळी जम्मू -काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराने जवळपास १०० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. १० मे रोजी शस्त्रसंधी झाल्यानंतर जम्मू -काश्मीर मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतीय लष्कर सीमेवर अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचा पुनरूच्चार यावेळी द्विवेदी यांनी केला. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील दहशतवाद्यांचा आकडा आता एकअंकी आहे.” दहशतवादी संघटनांना जाऊन मिळणाऱ्या तरूणांची संख्या शून्य असल्याचे द्विवेदी म्हणाले. लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले की, गरज पडल्यास भारतीय लष्कर पुन्हा एकदा 'ग्राउंड ऑफेंसिव्ह' करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. पाकिस्तानकडून होणाऱ्या कृत्याला भारतीय लष्कर अत्यंत प्रभावीपणे आणि ताकदीने उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चीन सीमेबाबतही स्पष्ट भूमिका :
एलएसीवरील परिस्थितीबाबत बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, "चीनसोबत राजनैतिक चर्चा सुरू असली, तरी लष्करी सज्जतेत कोणतीही कपात केलेली नाही. पायाभूत सुविधांच्या विकासावर आमचा भर असून आमचे जवान कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत."