मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. निवडणुकीसाठी प्रचारासाठी असलेला कालावधी सायंकाळी संपुष्टात आला आणि मागील काही दिवसांपासून कानावर पडणारा मतदार बंधू भगिनींनो हा आवाज शांत झाला. त्यामुळे प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे उमेदवार आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून आता प्रतीक्षा आहे ती येणाऱ्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची. या दिवशी जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची रणनिती आखली आहे. उमेदवारांनी घरोघरी गाठीभेटीवर भर दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्यावतीने तसेच अपक्षांसह तब्बल १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी मागील ३ जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात झाली होती आणि प्रचाराची सांगता मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाली आहे. मागील दहा ते अकरा दिवसांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जाहीर सभांसह घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर दिला. मागील अकरा दिवसांमध्ये उमेदवारांनी घरोघरी प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या आणि जाहीर सभांद्वारेही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे घरोघरी प्रचारासाठी विविध शक्कल लढवत प्रचार करतानाच आपली प्रचार पत्रके वाटली आणि याद्वारे यापूर्वी केलेली कामे तसेच पुढील पाच वर्षांतील व्हिजन मतदारांपुढे ठेवले. मुंबईतील रविवारी ठाकरे बंधूंची तर सोमवारी भाजप आणि शिवसेना महायुतीची सभा झाल्यामुळे या दोन्ही दिवशी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा एक दिवस वाया गेला.
राजकीय पक्षांचे उमेदवार
भाजप :१३७
शिवसेना: ९०
उबाठा :१६३
मनसे : ५३
राष्ट्रवादी (शप): ११
काँग्रेस :१३९
वंचित बहुजन : ६२
रासप : १०
रिपाइं : ३९
राष्ट्रवादी काँग्रेस : ९४
समाजवादी पक्ष :९०