मतदारसंघाची विजयाच्या समीकरणाची पायाभरणी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार अखेर मंगळवारी थांबल्यानंतर आता प्रचारातील कच्चे दुवे आणि मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्याकरता पुढील दोन दिवसांमधील रणनीती आखली जाणार आहे. यासाठी आता विविध मंडळे, गृहनिर्माण सोसायट्या आणि समाजाच्या लोकांच्या छुप्या पद्धतीने गाठीभेटी मतदान आपल्याबाजुने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रचार थांबल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मतदान फिरवण्यासाठी रात्रीच्या अंधारात आणि गुप्त जागी बैठका घेतल्या जातात. या राजकीय भाषेत चुहाँ मिटिंग म्हटली आहे. त्यामुळे आता प्रचार थांबल्यांनतर चुहाँ मिटिंग आता जोरात सुरू झालेल्या पाहायला मिळतील.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता आपण केलेल्या प्रचारानंतर मतदारांचा कौल कुठे असेल हे येत्या १६ जानेवारी रोजी मतमोजणीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे स्पष्ट होईल. मात्र, प्रचार संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंतच्या दोन रात्री या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि प्रत्येक उमेदवार या दोन्ही दिवसांच्या रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या गुप्त भेटी घेत असतो. आणि त्यांना मतदान आपल्याला करण्याचे आवाहन करतो. ही बैठक गुप्त असल्याने तसेच रात्रीच्यावेळी होत असल्याने याला चुहाँ मिटिंग असे संबोधले जाते.
उमेदवाराच्या प्रतिनिधींकडून महत्वाच्या सोसायटी, बैठका, प्रतिष्ठीत व्यक्ती, तसेच ज्याच्या शब्दाला मान आणि जी व्यक्ती आपल्या सांगण्यावर मते फिरवू शकते अशा सर्व व्यक्ती तसेच मंडळांचे प्रतिनिधी आदींची रात्रीच्या वेळी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी भेट घेऊन पैशांचे किंवा विकासकामांचे आश्वासन देत, त्यांना आपल्याकडे मतदान फिरवून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारामध्ये चुहाँ मिटिंगचे महत्त्व मोठे असून विरोधात जाणारा निकाल फिरवण्याची ताकद या चुहाँ मिटिंगमध्ये असल्याचे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.
महत्त्वाच्या ठिकाणचे निर्णायक मतदान : चुहाँ मिटिंगमध्ये पूर्वी मुंबईत शिवसेना पक्ष अग्रेसर होता. प्रचार संपल्यानंतर लोकांच्या गुप्त गाठीभेटी घेऊन त्यांचे मतदान आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न यशस्वी होत असल्याने नंतर भाजप आणि इतर पक्षांच्या उमेदवारांकडूनही होऊ लागला आहे; परंतु आता प्रचार संपल्यानंतर या चुहाँ मिटिंगची वाट न पाहता आता प्रचारादरम्यानही अशाप्रकारच्या गुप्त बैठका आणि गाठीभेटी दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी करत असतात. राजकीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पूर्वी प्रचार संपल्यानंतर चुहाँ मिटिंग व्हायच्या. परंतु आता प्रचारादरम्यान म्हणजे दुपारचा प्रचार संपला की संध्याकाळचा प्रचार सुरू होण्यापूर्वी तसेच रात्री प्रचार संपला की रात्री उशिरापर्यंत उमेदवाराला प्रचारात जिथे जिथे उणीव किंवा आपल्याला मतदान कमी होईल याचा अंदाज येतो, त्या भागातील सोसायटी, मंडळे आणि प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या बैठका घेतल्या जातात. आता या चुहाँ मिटिंग प्रचारादरम्यानही होत असल्याने पूर्वी शेवटच्या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या चुहाँ मिटिंग या फक्त महत्त्वाच्या ठिकाणांचे मतदान फिरवण्यासाठीच होते असे त्यांचे म्हणणे आहे.
विकासकामांवर मतांची खरेदी
अनेक सोसायटी तसेच इमारतींचे मतदान हे केवळ त्यांच्या भागातील विकासकामांवर फिरले जाते. यामध्ये इमारतीच्या छतावर पत्रे बसवणे, सोसायटी परिसरात लाद्या लावून देणे, सोलर प्लॅन देणे, पाण्याची टाकी बसवून देणे, रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे आदींची प्रत्यक्ष कामे किंवा यासाठीचा निधी दिला जातो. तसेच अनेक मंडळांना ठरावीक रक्कम दिली जाते. या सर्वांच्या जोरावर सोसायटी, इमारतीचा तसेच झोपडपट्टी परिसरातील मतदान शेवटच्या क्षणाला या चुहाँ मिटिंगनंतर कुठे दिले जावे याचा निर्णय घेतला जातो आणि त्यानुसार मतदान होते असे बोलले जाते.