मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल प्रक्रिया सुरू होईल. मात्र मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत यंदा वेगळी कार्यपद्धती राबवण्यात येणार असल्याने अंतिम चित्र स्पष्ट होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेतील सर्व वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी न करता ती नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे काही प्रभागांचे निकाल लवकर समोर येतील, तर काही ठिकाणी निकाल जाहीर होण्यासाठी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
२३ केंद्रांवर मतमोजणी, मर्यादित वॉर्ड एकावेळी
मुंबईत एकूण २३ ठिकाणी मतमोजणी केंद्रे कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक केंद्रावर अनेक वॉर्डांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात एकाच वेळी कमी संख्येतील वॉर्डांचीच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकाच वेळेस सर्व वॉर्डांचे निकाल लागणार आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, या व्यवस्थेमुळे मनुष्यबळाचे योग्य नियोजन करता येणार असून मतमोजणी प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता राखणे सोपे होणार आहे.
निकाल जाहीर होण्यास उशीर संभवतो
या नव्या पद्धतीनुसार, मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांची मतमोजणी एकूण पाच टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टप्प्यात ठरावीक संख्येतील वॉर्ड हाताळले जाणार असल्याने काही भागांचे निकाल दुपारनंतर तर काहींचे संध्याकाळपर्यंत समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे यंदा मुंबई महापालिकेच्या निकाल प्रक्रियेकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे.