मुंबई: रेल्वे प्रवाशांसाठी आज आनंदाची बातमी आहे. आज १४ जानेवारीपासून रेलवन ॲप डाऊनलोड केल्यास तिकीटावर एकूण ६% सवलत (Discount) मिळणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत रेल्वे तिकीट खरेदी केल्यास त्यावर ३% सवलत मिळणारच आहे परंतु ते पैसे रेल वन वॉलेटमधून दिल्यास अधिकची ३% सवलत प्रवांशाना मिळणार असल्याने एकूण ६% सवलत मिळू शकते. रेल्वेने या संदर्भात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे की ही सवलत केवळ रेल वन ग्राहकांसाठीच आहे इतर कुठल्याही ॲप अथवा संकेतस्थळावर ही ऑफर उपलब्ध नाही. ही ऑफर सहा महिन्यांसाठी उपलब्ध असून १४ जुलैपर्यंत वैध असणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेने या विषयी ३० डिसेंबर २०२५ रोजी या ऑफरचे सादरीकरण केले होते. आजपासून ती लागू होणार आहे.
मुख्यतः रेल्वे स्थानकावरील तिकीटसाठी रांगा कमी व्हाव्यात व डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे इंटिग्रेटेड व्यासपीठ रेल्वे प्रवाशांसाठी बनवण्यात आले आहे. या रेल वनमधून आरक्षित व विना आरक्षित तिकीटे खरेदी करण्यासाठी सुविधा असून उपनगरीय व लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तिकिट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच व्हॅल्यु अँडेड फूड ऑर्डरसारख्या सुविधाही या व्यासपीठात उपलब्ध असतील. यापूर्वी युटीएस हे अँप सरकारने तिकिट बुकिंगसाठी काढले असले तरी ते तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात येत असून रेल वन हे ३६० डिग्री इंटिग्रेटेड व्यासपीठाचा पाया रेल्वेने रोवला आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेलवन हे एक 'वन-स्टॉप सोल्युशन' आहे. या अँप अंतर्गत एकाच छताखाली सगळ्या सुविधा प्रवाशांना मिळतील. अँड्रॉइड आणि आयओएसवर विनामूल्य प्रवासी डाउनलोड करू शकतात. तिचा इंटरफेस खूप सोपा आणि सोयीस्कर आहे. एकदा लॉग इन केल्यानंतर,mPIN किंवा बायोमेट्रिक वापरून) सगळ्या इंटिग्रेटेड सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. रेलवन ॲप ट्रेन अलर्ट, पीएनआर स्थिती अपडेट्स, बुकिंगचे कन्फर्मेशन आणि तक्रारींच्या स्थितीसाठी (Status Updates) रिअल-टाइम सूचना प्रदान करते. यामुळे प्रवाशांना सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर मिळतील याची खात्री होते.