हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलन जिल्ह्यातील नालागढ पोलीस स्टेशनच्या हद्दीत, स्टेशनच्या अगदी जवळील एका गल्लीमध्ये जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज तब्बल ४०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत ऐकू आला.
स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या असून, जवळ असलेल्या आर्मी हॉस्पिटललाही मोठा फटका बसला आहे. हॉस्पिटलच्या खिडक्या तुटून काचा रस्त्यावर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तसेच मालमत्तेचेही गंभीर नुकसान टळले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून नागरिकांना घटनास्थळी जाण्यास कडक मनाई करण्यात आली आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, तो अपघाती होता की घातपाताचा प्रकार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, एसपी बद्दी विनोद धीमान यांच्यासह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले असून सखोल तपास सुरू आहे. स्फोटासाठी वापरण्यात आलेले साहित्य, वेळ आणि कारण याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील माहिती लवकरच समोर येईल.