मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटासाठी नामुष्की झाली आहे, अवघ्या काही तासांत पक्षातून दोन महत्त्वाच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. मनपासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. प्रचाराचा जोर वाढलेला आहे. या परिस्थितीत उबाठामध्ये झालेली ही गळती उद्धव यांच्या पक्षासाठी धक्कादायक मानली जात आहे.
सर्वप्रथम माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उबाठाशी संबंध तोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आता आणखी एका उद्धव समर्थकाने शिवसेना उबाठा सोडली आहे. गोरेगाव परिसरातील ठाकरे गटाचे जुने, विश्वासू नेते मानले जाणारे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तब्बल चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दिलीप शिंदे यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र मनसे–ठाकरे गट युतीमुळे त्यांच्या पारंपरिक वॉर्डमध्ये उमेदवारीची संधी न मिळाल्याने ते नाराज होते, अशी माहिती समोर येत आहे.
उमेदवारीवरून असंतोष उफाळला
ज्या प्रभागातून दिलीप शिंदे सातत्याने निवडून येत होते, तो प्रभाग यंदा मनसेला देण्यात आल्याने त्यांची राजकीय गणिते बिघडली. या निर्णयानंतर त्यांनी काही दिवस पक्षात अस्वस्थता व्यक्त केली होती. अखेर मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सपकाळांच्या पक्षप्रवेशामागचे कारण
माजी आमदार दगडू सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत, “अत्यंत कठीण मनाने निर्णय घ्यावा लागला,” असे सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या कन्या रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभा क्षेत्रातील एका प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने सकपाळ कुटुंब नाराज असल्याचे बोलले जात होते. महानगरपालिका निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गटातून होत असलेली ही गळती प्रचाराच्या रणनीतीवर किती परिणाम करणार, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.