पालघर : पालघर शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या आंबेडकर चौक ते नीलसृष्टी अपार्टमेंट दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या कामामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुसूत्रता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष वाहतूक नियंत्रण अधिसूचना लागू केली आहे. ही सूचना ८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी (रात्री १२ वाजेपर्यंत) अमलात राहणार आहे. या काळात सदर मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असताना अपघात टाळण्यासाठी आणि कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जड आणि हलकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांना या बंद मार्गावरून जाण्यास मनाई असून, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
- मार्ग १ : पालघर रेल्वे स्टेशन – जगदंबा हॉटेल – वीर सावरकर चौक (वळण चौक) मार्गे आंबेडकर चौक.
- मार्ग २ : पालघर रेल्वे स्टेशन – पृथ्वीराज चौक – शिवाजी महाराज चौक मार्गे आंबेडकर चौक.
प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ही नवीन व्यवस्था राबविली जात आहे. अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी आणि रस्ता कामासाठी प्रशासनास सहकार्य करावे. स्थानिक पातळीवर आणि ग्रामीण भागात या अधिसूचनेची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.