मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार अपुऱ्या ठरणाऱ्या पायाभूत सुविधा याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. रोजच्या प्रवासासाठी वापरले जाणारे अनेक पादचारी पूल आजही अस्तित्वात असले तरी, त्यापैकी काहींची अवस्था गंभीर बनली आहे. पर्याय नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून हे पूल वापरत असल्याचं चित्र आहे.
असाच एक जुना पादचारी पूल भाऊ दाजी रोड परिसरातून माटुंगा पश्चिमेकडील किंग्ज सर्कल परिसराकडे जाण्यासाठी वापरला जातो. वर्षानुवर्षे वापरात असलेला हा पूल सध्या सुरक्षिततेच्या निकषांवर अपुरा ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येते. शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणावर या पुलावर अवलंबून आहेत.
महत्त्वाचा दुवा, पण अवस्था चिंताजनक
माटुंगा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा पूल परिसरातील महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र पुलावरील जिन्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आणि उंचसखल असल्यामुळे चालताना तोल जाण्याचा धोका निर्माण होतो. सुरक्षेसाठी असलेली लोखंडी रेलिंगही काही ठिकाणी मोडलेली व सैल झालेली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.
देखभाल नाही, तक्रारी दुर्लक्षित
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या पुलाबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, आजपर्यंत ठोस दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीची कोणतीही कारवाई झालेली नाही. पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
कचरा, वनस्पती आणि निसरडे मार्ग
पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून, माती आणि बांधकाम साहित्याचे ढिगारेही दिसून येतात. विशेषतः माटुंगा पूर्वेकडील टोकाला वाळलेली पानं आणि जंगली झाडझुडपांमुळे चालण्याची जागा अरुंद झाली आहे. पावसाळ्यात हा पूल अधिकच निसरडा बनत असल्याने नागरिकांना मोठा धोका पत्करावा लागतो.
इतका महत्त्वाचा दुवा असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. किमान तात्पुरती दुरुस्ती करून पूल सुरक्षित बनवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.दरम्यान, हा मुद्दा समोर आल्यानंतर, पुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, तांत्रिक मूल्यांकनासाठी स्वतंत्र पथक नेमले जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहे.