ओडिशा : ओडिशातील राउरकेला परिसरात एक गंभीर विमान दुर्घटना घडली असून, इंडिया वन कंपनीचे छोटे विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान भुवनेश्वरहून राउरकेलाकडे जात होते. उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात रघुनाथपाली परिसरात विमान जमिनीवर आदळले. या विमानात पायलटसह एकूण ९ जण प्रवास करत होते.
जखमींवर उपचार सुरू
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. उर्वरित तीन प्रवाशांबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अपघाताचं कारण अस्पष्ट
विमानात नेमका तांत्रिक बिघाड झाला होता की अन्य कोणतं कारण अपघातामागे आहे, याबाबत सध्या स्पष्टता नाही. ओडिशा पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.