नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 'जीत कोच' नावाची ही खासगी बस शिमला येथून कुपवीकडे जात होती. सिरमौर जिल्ह्यातील रेणुकाजी विधानसभा क्षेत्रातील हरिपुरधारजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरून खाली घसरली आणि खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी प्रवाशांचा मोठा आक्रोश ऐकायला मिळत होता. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, जखमींना हरिपुरधार येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. या रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. सुक्खू सरकारने या रुग्णालयाचा दर्जा कमी (डिनोटिफाई) केल्यामुळे उपचारात अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेणुकाजीचे आमदार विनय कुमार आणि एसपी निश्चित सिंह नेगी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्रींनी व्यक्त केला शोक
स्थानिकांचे धाडसी बचावकार्य अपघात होताच हरिपुरधार बाजारपेठेतील स्थानिक नागरिकांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. बस पूर्णपणे चक्काचूर झाल्यामुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने हरिपुरधार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवासी संख्या जास्त असल्याने जखमींचा आकडा मोठा असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "सोलनहून हरिपुरधारला जाणाऱ्या खासगी बसचा झालेला हा अपघात अत्यंत वेदनादायक आहे. या भीषण दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना." या अपघातामुळे संपूर्ण सिरमौर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.