वांद्र्यातील घटनेने निवडणुकीत खळबळ
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचाराच्या दरम्यान काही गुन्हेगारी स्वरूपाच्या धक्कादायक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे परिसरात ज्ञानेश्वर नगर येथे प्रचार सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ९२ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.
वांद्रे परिसरात प्रचार सुरू असतानाच शिवसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर कुरेशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली असली तरी या घटनेने समर्थकांमध्ये चिंता पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे दिग्गज राजकीय नेते प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या प्रचारादरम्यान, राजकीय नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच काही ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना देखील घडताना दिसत आहेत. काही भागांत हल्ले होत आहेत. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे.
निवडणूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे मुंबईतील निवडणूक प्रचारादरम्यान वाढत्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली जात आहे. प्रचाराच्या काळात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापत चालले आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने सर्वच पक्षांकडून रात्रंदिवस प्रचार सुरू आहे. अशा वातावरणात घडलेल्या या हिंसक घटनेमुळे निवडणूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रचार करत असतानाच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.