पालघर: गेल्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सन २०२४ आणि २०२५ या कालावधीत जिल्ह्यात ७८६ गंभीर गुन्हे दाखल झाले असून, खुनासारख्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. मात्र, या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पालघर पोलिसांनी कंबर कसली असून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले आहे. २०२४ मध्ये ३५ खून झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ३१ वर राहिली. दोन वर्षांत एकूण ४४ खुनाचे प्रयत्न झाले आहेत. जिल्ह्यात घरफोडीचे १८६ आणि वाहन चोरीचे १७८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. याशिवाय ७ दरोडे आणि ३८ जबरी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारी वाढत असली तरी पालघर पोलिसांनी अवैध धंदे आणि अमली पदार्थांविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम उघडली आहे. दोन वर्षांत पोलिसांनी एकूण १०३३ कारवाया करून १३८४ आरोपींना गजाआड केले आहे. या मोहिमेत एकूण २४ कोटी ५७ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय ई. सी. कायद्यानुसार ३० गुन्हे दाखल करून ४० व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ५० लाख ८३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण पाहता दोन वर्षांत १०३३ कारवाया, १३८४ अटका करण्यात आल्या असून, २४ कोटी ५७ हजार २३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरत असला, तरी पोलिसांच्या कठोर कारवायांमुळे अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर मोठा दबाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
हजारांहून अधिक कारवाया यशस्वी
कारवायांचा तपशील :
१. अवैध दारू धंदे : ८१२ ठिकाणी छापे टाकून ८१८ आरोपींना
अटक, ६.५९ कोटींचा माल जप्त.
२. अमली पदार्थविरोधी मोहीम : ५४ कारवायांमध्ये ८५ जणांना अटक करून ३.५९ कोटींचे ड्रग्ज हस्तगत.
३. अवैध धंदे : ६१ छापेमारीत २८३ आरोपी ताब्यात, ८२.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त.
गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक
वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी पोलिसांच्या धडाकेबाज कारवायांमुळे अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडले आहे. अमली पदार्थ आणि दारू तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाया अधिक तीव्र केल्या जात आहेत.