नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने निवडणूक रणनीतीकार संस्था आयपीएसीचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकात्यातील निवासस्थानासह देशभरातील १५ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईची बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संताप व्यक्त करत थेट छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या आणि आयटी ऑफिसमधील अनेक फाईल घेऊन आपल्या गाडीत ठेवल्या आहेत.
छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर लोकशाही चिरडल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, ‘केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना डरावण्याचा प्रयत्न करत आहे. हा लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि तपास यंत्रणा देशाप्रति आपली जबाबदारी विसरल्या आहेत. मला अशा प्रकारच्या कारवाईची पूर्वसूचना मिळाली होती. त्यामुळे पक्षाशी संबंधित सर्व महत्त्वाचे डेटा आणि हार्ड डिस्क आधीच सुरक्षित करण्यात आल्या आहेत. आमच्या आयटी ऑफिसवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत, पण आम्ही या राजकीय षडयंत्राला घाबरणार नाही’, असे ममता यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने ही कारवाई फर्जी सरकारी नोकरी नियुक्ती पत्रांच्या घोटाळ्याशी तसेच कोळसा घोटाळा प्रकरणासंबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केली आहे. सहा राज्यांमध्ये एकाच वेळी १५ ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. एका संघटित टोळीने हा मोठा घोटाळा केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.