मुंबई : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी विरोधकांच्या तथाकथित मुलाखतीवर जोरदार टीका करत, ती “करप्ट लोकांची स्क्रिप्टेड मुलाखत” असल्याचा आरोप केला आहे. या टीकेदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी थेट शब्दांत सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या राजकीय धसक्यानेच आज हे सगळे नाट्य रचले जात आहे. ठाकरे बंधूंच्या नावांचा थेट उल्लेख न करता डॉ. वाघमारे म्हणाल्या, “ज्या दोन भावांनी वर्षानुवर्षे एकमेकांचे चेहरेही पाहिले नाहीत, ते आज एकाच सोफ्यावर बसले आहेत. ही एकता नाही, तर एकनाथ शिंदे नावाच्या वादळाने उडवलेली झोप आहे.” त्यांच्या मते, जनतेला हे स्पष्ट दिसत आहे की सत्ता गेल्यावर अचानक आलेली ‘एकजूट’ ही केवळ राजकीय मजबुरी आहे.
विरोधकांवर खोचक टीका करत त्या म्हणाल्या, “ही ‘टॉम अँड जेरी’ची जोडी कितीही प्रयत्न केले, तरी वाघाला म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान देऊ शकणार नाही.” जनतेचा कौल आणि वास्तवातलं प्रशासन यामध्ये जमीनअस्मानाचं अंतर असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
डॉ. वाघमारे यांनी थेट सवाल केला, “मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे घराबाहेर न पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आज अचानक जनतेच्या दुःखाची आठवण कशी झाली? तेव्हा प्रशासन कुठे होतं? शेतकरी, कामगार, सामान्य जनता त्रस्त असताना हे लोक काय करत होते?”
ही संपूर्ण मुलाखत म्हणजे राजकारण नव्हे तर सिनेमाचा सेट असल्याची टीका करत त्या म्हणाल्या, “राजकारणाला सिनेमा समजून कितीही मोठे सेट उभे केले, मुलाखतींचे खेळ खेळले, तरी ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ची ही जोडी आता पूर्णपणे आऊटडेटेड झाली आहे.” शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, “स्क्रिप्टेड मुलाखती, बनावटी एकजूट आणि खोटा कळवळा महाराष्ट्राची जनता ओळखते. खरी स्क्रिप्ट आता जनता लिहिणार आहे आणि त्यात एकनाथ शिंदे यांचे काम बोलणार आहे.”