३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला
मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक अपघात झाला. मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३००.१ येथे नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल वाहनाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.
समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड येथे रात्रगस्त पेट्रोलिंग सुरू असताना सीआरओ संभाजीनगर यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली की, चॅनल क्रमांक ३००.१ (मुंबई कॉरिडोर) येथे एका ट्रॅव्हलला आग लागली आहे. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे व एम.एस.एफचे दोन जवान घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर खुराणा ट्रॅव्हलची बस रस्त्याच्या कडेला जळत असल्याचे दिसून आले. ट्रॅव्हलचे चालक वाहिद शेख यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ट्रॅव्हलच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. ही बस नागपूरहून नाशिककडे जात होती. वाहनामध्ये ३६ प्रवासी प्रवास करत होते.