'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा
चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचा किती आदर करतात, याची प्रचिती नुकतीच चिपळूणमध्ये आली. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांची प्रकृती एका कार्यक्रमात बिघडल्यानंतर, त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि सध्याचे प्रखर विरोधक आमदार भास्कर जाधव यांनी राणे साहेबांबद्दल अत्यंत भावूक वक्तव्य केलं आहे. "राजकीय मतभेद असले तरी आमच्यातील जुना जिव्हाळा आजही कायम आहे," असे म्हणत जाधवांनी राणे साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम केला.
अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काहीही घडू शकते' याची प्रचिती अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आली आहे. विचारधारेच्या पलीकडे जाऊन ...
राणे साहेबांचा तो उत्साह आणि धावपळीचे जीवन
चिपळूणमधील एका कार्यक्रमात भाषण करत असताना राणे साहेबांना अचानक भोवळ आली. प्रकृती साथ देत नसतानाही, केवळ लोकांसाठी व्यासपीठावर उभे राहण्याच्या त्यांच्या दांडग्या उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "राजकारण्यांना २४ तास काम करावे लागते, सण-उत्सव नसतात आणि ९९ टक्के नेत्यांना वेळेवर जेवणही मिळत नाही. राणे साहेबांनी आयुष्यभर जनतेसाठी जी धावपळ केली, त्याचाच हा परिणाम आहे."
मनातील जुने ऋणानुबंध कधीही...
भास्कर जाधव यांनी राणे साहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. "मी आणि राणे साहेबांनी अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आमचे केवळ राजकीयच नाही, तर घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. माझं बेधडक वागणं आणि स्पष्टपणे बोलणं राणे साहेबांना नेहमीच आवडत असे. आमच्या वयात केवळ ५-६ वर्षांचे अंतर आहे. राजकीय प्रवासात काही वळणांवर आमच्यात अंतर पडले, बोलण्यात कटुता आली, तरीही मनातील जुने ऋणानुबंध कधीही पुसले जाऊ शकत नाहीत," असे सांगताना जाधव काहीसे भावूक झाले होते.