सहा ते आठ महिन्यांत तीन प्रकल्प होणार सुरू
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अन्य कारणांसाठी वापर
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांचा वचननामा जाहीर करण्यात आला. या वचननाम्यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मलनिस्सारण प्रकल्प अर्थात सिवरेज ट्रीटमेंट प्लांट वेळेत पूर्ण करणार आणि हे पाणी अन्य कामासाठी वापरणार अशाप्रकारचे आश्वासन मतदारांना दिले आहे. विशेष म्हणजे हे सर्व मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम सन २०१२ पासून तसेच त्या आधीपासून कागदावरच होते आणि सन २०२२ नंतर याला मंजुरी मिळून याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातील घाटकोपर, वर्सोवा आणि भांडुप हे तीन मलजल प्रक्रिया केंद्र ही सन २०२६ मधील जुलै तसेच ऑगस्टमध्ये पुर्णत्वास येत आहेत. तसेच यातील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा अन्य कारणांसाठी वापर करण्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी टाकून त्याची उपाययोजनाही केली जात आहे. त्यामुळे प्रशासकाच्या काळात सुरु असलेल्या कामांवर उबाठा जनतेची दिशाभूल करायला चालले आहेत असे वचननाम्यातून स्पष्ट दिसून येत आहे.
उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप यांच्यावतीने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहिर केलेल्या वचननाम्याचा पंचनामा आता प्रहारच्यावतीने केला जात आहे. त्यातील पहिला भागात मल जल प्रक्रिया केंद्राचा समावेश करून याबाबतची आजची स्थिती आणि विरोधकांकडून कशाप्रकारे जनतेची दिशाभूल केली जाते यावर लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत.
मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने वरळीमध्ये ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन, वांद्रे येथे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन, मालाडमध्ये ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन, घाटकोपरमध्ये ३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन, धारावीमध्ये ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन, भांडुपमध्ये २१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन आणि वेसावे (वर्सोवा) येथे १८० दशलक्ष लीटर प्रतिदिन याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणीची कार्यवाही वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांद्वारे दररोज २ हजार ४६४ दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या सातही मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची भौतिक कामे वेगाने सुरू आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार, घाटकोपर, वेसावे (जुलै २०२६), भांडुप (ऑगस्ट २०२६), वरळी, वांद्रे, धारावी (जुलै २०२७) आणि मालाड मलजल प्रक्रिया केंद्र (जुलै २०२८) पूर्णत्वाचा कालावधी आहे.
या मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे फोर्ट, भायखळा, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), गावदेवी, हाजीअली, प्रभादेवी, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, खेरवाडी, वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी), सांताक्रुझ, माटुंगा, वडाळा, शीव – कोळीवाडा, ब्राह्मणवाडी, अंधेरी पूर्व, वेसावे, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पूर्व, जुहू, विलेपार्ले पश्चिम, ओशिवरा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड आदी परिसरातील लोकसंख्येला फायदा होणार आहे.
मलजल प्रक्रिया कार्य अंतर्गत प्राथमिक व दुय्यम प्रक्रियांसह १ हजार २०० दशलक्ष लीटर मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रियाही केली जाणार आहे. या पाण्याचा पुनर्वापर विविध कामांसाठी केला जाणार आहे. तसेच, टप्प्याटप्प्याने १०० टक्के मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया करून याचा पुनर्वापर केला जाणार आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होणार आहे.
भांडुप, घाटकोपर, वेसावे आणि मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्र अस्तित्त्वातील खारक्षेत्रमध्ये उभारले जात आहेत. कांदळवनामुळे मालाड मलजल प्रक्रिया केंद्र उभारणी कामाला परवानगी मिळण्यासाठी विलंब झाला. जागेची उपलब्धता कमी असल्याने बहुमजली इमारतीत धारावी मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जात आहे. या केंद्रातून बाहेर पडणारे फेरप्रक्रियायुक्त पाणी मिठी नदीत सोडले जाणार आहे. वांद्रे पश्चिम परिसरात सागरी सेतू नजीक वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. या ठिकाणी छतावरील बाग आणि व्ह्युविंग टॉवर अशा वैशिष्ट्यपूर्ण वास्तूही उभारण्यात येणार आहे
त्यामुळे सन २०१२पासून उबाठा मल जल प्रक्रिया केंद्राबाबत जनतेला आश्वासन देत असून त्यांना हे प्रकल्प मागील दहा वर्षांमध्ये म्हणजे २०२२च्या आधी पूर्ण करता आलेले नाहीत. परंतु खऱ्या अर्थाने याला गती प्राप्त झाली आहे ती प्रशासकाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीन लक्ष घातल्याने तसेच स्वत: महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी सातत्यपूर्ण आढावा घेत या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केल्यामुळे या वर्षांतच तीन प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, तर बाकीचे प्रकल्प पुढील वर्षांत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे जे उबाठाला आपल्या सत्ता काळात करता आले नाही तर प्रशासकांनी आपल्या साडेतीन वर्षांच्या काळात पूर्णत्वास आणून दाखवले आहे.