वाड्यातील आयडियल कॉलेजमध्ये वादग्रस्त प्रकरण
वाडा : तालुक्यातील पोशेरी येथे असलेल्या आयडियल फाऊंडेशन कॉलेजमध्ये फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी नुकताच प्रवेश घेतलेल्या एका हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्तीने नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच घडलेल्या प्रकाराबाबत संतप्त विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयडियल कॉलेजवर गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल फाऊंडेशनच्या उच्च व तंत्र शिक्षणातील विविध विद्या शाखांना मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. चार दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील अश्विनी बिल्लर सदगीर या विद्यार्थिनीने फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. कॉलेजच्याच वसतिगृहात अन्य विद्यार्थिनींसह ती राहत होती. रविवार,(दि. ४)रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान वसतीगृहाच्या अधिक्षिका व अन्य दोन मुस्लिम विद्यार्थिनींनी अश्विनी तिला जबरदस्तीने नमाज पठण करायला सांगितले.
या प्रकाराने घाबरलेल्या अश्विनीने घडलेला प्रकाराची माहिती पती व वडिलांना दिली. त्यानंतर संबंधित कॉलेज प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा प्रकार रॅगिंगशी संबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून पुढील तपास वाडा पोलीस करीत आहेत.