काँग्रेसचे केवळ १० जागांवर उमेदवार
विरार : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत तब्बल ११३ जागांवर बहुजन विकास आघाडीने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे उमेदवारी दाखल करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये वसई-विरार येथे बहुजन विकास आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
वसई - विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि मनसे या राजकीय पक्षांनी एकत्रित आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले. जागांचा तिढा न सुटल्याने शिवसेना (उबाठा) आघाडीच्या चर्चेतून सर्वप्रथम बाहेर पडली आणि स्वबळावर ८९ उमेदवार या निवडणुकीत उभे केले. तिसरा क्रमांक भारतीय जनता पक्षाचा लागत आहे. भाजपने ९३ उमेदवार निवडणुकीत उभे केले असून, यातील ४ जागांवर शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी एकमत न झाल्याने चार जागांवर भाजप शिवसेना यांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे, तर ८९ उमेदवार हे भाजपने कमळ निशाणीवर निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला सुद्धा भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून २७ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी झाली किंवा नाही याबाबत काँग्रेसचा कोणताही नेता स्पष्ट सांगू शकत नाही. असे असले तरी काँग्रेसने सात जागांवर माघार घेतली असून १० जागांवर उमेदवार कायम ठेवले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
केवळ दोन जागांवर शिट्टी चिन्ह नाही
प्रभाग क्रमांक १५ ‘अ’ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेवर बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हावर कोणताही उमेदवार नाही. विशेष म्हणजे या जागेसाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील या निवडणूक रिंगणात आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ या जागेसाठी शिट्टी या चिन्हावर उमेदवार नाही. या ठिकाणी भाजप वसई पश्चिम ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष आशिष जोशी यांच्या पत्नी मनीषा जोशी या भाजपकडून निवडणूक लढवीत आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला बहुजन विकास आघाडीने समर्थन दिल्याची चर्चा आहे.
चर्चा पैशांची, शिट्टीची अन् मिळाली अंगठी
वसई-विरारच्या भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील ह्या प्रभाग क्रमांक १५ मधून अविरोध निवडून येतील याबाबतचे तर्कवितर्क दोन दिवसापूर्वी संपुष्टात आले. पाटील यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार हर्षदा मटकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजप समर्थकांकडून तर अर्ज मागे घेऊ नये म्हणून बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांकडून पैशाचे आमिष दाखविण्यात आल्याच्या चर्चाही झाल्या. मात्र मटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर चर्चा सुरू झाली निवडणूक चिन्हाची. मटकर ह्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चिन्ह वाटपाच्या दिवशी मटकर यांना अंगठी हे निवडणूक चिन्ह अपक्ष उमेदवार म्हणून मिळाले आहे. त्यामुळे पैसे, शिट्टी येथून सुरू झालेली चर्चा आता अपक्ष आणि अंगठीवर येऊन थांबली आहे.
दोन महिला विधिज्ञ आमने-सामने
प्रभाग क्रमांक ५ ‘क’ या जागेसाठी दोन महिला वकिलांमध्ये लढत होत आहे. या जागेसाठी भाजपकडून ॲड. दर्शना त्रिपाठी कोटक, तर बहुजन विकास आघाडीकडून ॲॅड. अर्चना जैन या निवडणूक लढत आहेत. या दोन महिला वकिलांच्या लढतीमध्ये मशाल या चिन्हावर संगीता नाईक या आपले नशीब आजमावित आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वच जागांवरील लढती चर्चेतल्या
उमेदवारांमध्ये आहेत.