मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला आपल्या संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या मिनी-लिलावात केकेआरने मुस्तफिझूरला तब्बल ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू ठरला होता. मात्र, बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील कथित हल्ल्यांच्या बातम्यांमुळे भारतात राजकीय आणि धार्मिक संघटनांकडून मुस्तफिझूरच्या समावेशाला विरोध वाढत होता.
सध्याच्या परिस्थितीचा आणि सर्वत्र घडत असलेल्या घडामोडींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, बीसीसीआयच्या निर्देशांनुसार केकेआरने मुस्तफिझूरला संघातून वगळले आहे. केकेआरने विनंती केल्यास त्यांना लिलावात मोजलेली संपूर्ण रक्कम (९.२० कोटी) परत केली जाईल आणि त्याजागी नवीन खेळाडू निवडण्याची परवानगी दिली जाईल. राजकीय परिस्थितीमुळे खेळाडूवर बंदी घालण्याची ही घटना आयपीएलमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
अलीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात असंतोष पसरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडीओंमुळे संताप वाढला आणि अनेक संघटनांनी बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल २०२६ मध्ये खेळू देऊ नये, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुस्तफिझूर रहमानला केकेआरमधून वगळण्याचा दबाव वाढला. या मुद्द्यावरून काही राजकीय नेत्यांनीही थेट शाहरुख खान आणि केकेआर व्यवस्थापनावर टीका केली होती. त्यामुळे हा विषय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचा मुद्दा बनला.
आयपीएलमधील अनुभव
मुस्तफिझूर रहमान २०१६ पासून आयपीएल खेळत आहे. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स अशा अनेक संघांकडून तो खेळला आहे. आतापर्यंत ६० आयपीएल सामन्यांत त्याने ६५ विकेट घेतल्या आहेत.