नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांचा वापर करून महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या कथित गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या कृतींमुळे महिलांच्या गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन होते. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रात लिहिले आहे की, सोशल मीडियावर, विशेषतः 'एक्स'वर, एआय ग्रोकचा गैरवापर केला जात आहे. यामध्ये पुरुष बनावट खात्यांचा वापर करून महिलांचे फोटो पोस्ट करत आहेत. ग्रोकला चुकीच्या सूचना करून आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. हे केवळ बनावट खात्यांद्वारे फोटो शेअर करण्यापुरते मर्यादित नाही, तर ज्या महिला स्वतःचे फोटो पोस्ट करतात त्यांनाही लक्ष्य केले जात आहे. हे अस्वीकार्य आहे आणि एआयचा हा घोर गैरवापर आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याहून वाईट गोष्ट म्हणजे, ग्रोक अशा विनंत्या मान्य करून या वर्तनाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या.
सदर प्रकार हा महिलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. तसेच महिलांच्या फोटोचा अनधिकृत वापर केला जात आहे, जो केवळ अनैतिकच नाही, तर गुन्हेगारी देखील आहे, असे त्यांनी म्हटले. प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'विरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची आणि महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एआय-आधारित साधनांमध्ये सुरक्षा उपाय लागू करण्याची विनंती केली आहे.