मुंबई : ३ जानेवारी २०२५ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयाराम गयारामची चलती होती. समाजवादी पक्षात आयात केलेल्यांना उमेदवारी देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांनी राज्यात पार्टीला स्वत:ची जहागीर बनवले असून महानगरपालिका निवडणुकीत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केली आहे, असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
आमदार रईस शेख यांनी राज्यात पार्टीमध्ये सुरू असलेल्या गोंधळाबाबत अखिलश यादव यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी भिवंडीमध्ये माझ्यासोबत असलेल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून उमेदवारी नाकारली गेली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी २०१९ आणि २०२४ मध्ये पक्षाला भिवंडीमध्ये विजयी करण्यात भूमिका बजावली त्यांना या निवडणुकीत बाजूला करण्यात आले. अबु आझमी यांनी एककल्ली आणि मनमानी पद्धतीने उमेदवारी दिल्या आहेत, असा आमदार रईस शेख यांनी पत्रात आरोप केला आहे. मुंबईत माझ्याविरोधात पार्टीमध्ये अपप्रचार केला जात आहे. आयात उमेदवारांना पायघड्या घालण्यात येत आहेत. मी म्हणजे पार्टी... अशी प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांची वर्तणूक आहे. एनसीपी आणि शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य उमेदवारांची मुंबईत यावेळी निर्णयक भूमिका असताना समाजवादी पार्टीमध्ये नेत्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न चालू आहेत. या सर्वांचा फटका यावेळी पार्टीला बसू शकतो, असा इशारा आमदार रईस शेख यांनी पत्रामध्ये दिला आहे.
२०१० मध्ये भिवंडी पूर्व विधानसभेला अबु आझमी यांच्या मुलगा फरहान आझमी याचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये मला भिवंडी पूर्वमध्ये उमेदवारी दिली गेली, त्यावेळी १५०० मतांनी मी जिंकलो. पाच वर्षात आमदार म्हणून केलेल्या कामांमुळे २०२४ मध्ये मी ५२ हजार मतांनी मी निवडून आलो. भिवंडीत समाजवादी मुख्य भूमिकेत आहे.