रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी पुकारलेल्या युद्धाला शनिवारी मोठे यश आले. सुकमा आणि विजापूर या दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. एकीकडे चकमकी सुरू असतानाच दुसरीकडे मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी नेता देवा बरसे याने आपल्या २० सहकाऱ्यांसह शरणागती पत्करल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
सुकमा आणि विजापूरमध्ये गोळीबाराचा थरार
सुकमा मोहीम : सुकमाच्या किस्ताराम भागात डीआरजी (DRG) पथकाने शनिवारी सकाळी ८ वाजता मोठी कारवाई केली. या भीषण चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले आहेत.
विजापूर मोहीम : विजापूरमध्ये पहाटे ५ वाजल्यापासून सुरक्षा दलांचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. येथे दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून, त्यापैकी एकावर ५ लाख तर दुसऱ्यावर ८ लाख रुपयांचे इनाम होते. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
तिरुवनंतपुरम : तामिळनाडूतील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. चेंगगम जवळील पाकिरिपालयम गावात अज्ञात व्यक्तींनी एका ...
मोस्ट वॉन्टेड 'देवा बरसे'ची शरणागती
एकीकडे नक्षलवादी मारले जात असतानाच, नक्षलवाद्यांच्या विशेष क्षेत्रीय समितीचा (SZCM) महत्त्वाचा सदस्य देवा बरसे याने हैदराबादमध्ये आत्मसमर्पण केले. देवासोबत इतर २० नक्षलवाद्यांनीही हिंसेचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नक्षलवाद्यांचे नेटवर्क खिळखिळे झाले आहे.
ओडिशात १ कोटीचा इनाम असलेला कमांडर ठार
या कारवाईपूर्वी २५ डिसेंबर रोजी ओडिशाच्या कंधमालमध्येही सुरक्षा दलांनी मोठी मोहीम राबवली होती. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले असून, त्यात केंद्रीय समितीचा सदस्य (CCM) गणेश उईके याचा समावेश आहे. ६९ वर्षीय उईकेवर सरकारतर्फे १ कोटी रुपयांचे इनाम होते. या कारवाईत दोन महिला नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. सध्या सुकमा आणि विजापूरच्या घनदाट जंगलात शोध मोहीम अजूनही सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू असून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.