मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान कुलाबा मतदारसंघात विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आणि अर्ज दाखल करण्यापासून रोखल्याचा आरोप झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. कोणत्याही उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला नसल्याचे स्पष्ट करताना, हे विरोधकांनी तयार केलेले 'फेक नरेटीव्ह' असल्याचे ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर २०२५) कुलाबा येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज दाखल करण्यापासून रोखले, असा आरोप उबाठा-मनसे युतीचे उमेदवार बबन महाडिक आणि आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला. तसेच, सीसीटीव्ही फुटेजचा काही भाग गायब असल्याचा गंभीर आरोप प्रीती मेनन-शर्मा यांनी केला.
यावर स्पष्टीकरण देताना राहुल नार्वेकर म्हणाले, "दमदाटी कशाला म्हणतात याची व्याख्या प्रत्येकाने स्वतः ठरवावी. जर एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याची दखल घेणे ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. मी फक्त माझ्या उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी आलो होतो. घोळका घालणाऱ्यांना पोलिसांना समज देण्याची विनंती केली, त्यापलीकडे काही घडले नाही."
ते पुढे म्हणाले, "हा विरोधकांचा सातत्याने फेक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. त्या दिवशी भाजपच्या उमेदवारांनाही वेळ संपल्यामुळे अर्ज भरता आला नव्हता. ज्यांना वेळेत पोहोचता आले नाही, त्यांचे अर्ज फेटाळले गेले. याचा राजकीय विषय न करता निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेणे हे असंवैधानिक आहे. जनतेला आता निर्णय घेऊ द्या. फेक नरेटीव्ह कितीही सेट केला तरी मुंबईची जनता त्यांच्यासोबत उभी राहील, जो गेल्या पाच वर्षांत झोपडपट्ट्या, गल्ली-बोळात जाऊन प्रश्न सोडवतो, मुंबई स्वच्छ ठेवतो, चांगले रस्ते बनवतो आणि मुंबईचा विकास करतो", असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.