रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या ताम्हिणी घाटात शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. सुमारे ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याबाहेर घसरत खडकाळ भागावर जाऊन आदळली. या अपघातात बसने एका कारलाही जोरदार धडक दिल्याने ती कार रस्ता ओलांडून थेट झाडीत जाऊन अडकली. या दुर्घटनेत २७ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ८ ते १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर बस शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पुण्यातील भोसरी परिसरातून रवाना झाली होती. बसमध्ये भोसरी येथील सावन IB Auto प्रा. लिमिटेड कंपनीचे कर्मचारी होते. हे सर्व कर्मचारी काशिद बीचला सहलीसाठी निघाले होते. दुपारी ताम्हिणी घाटात प्रवेश केल्यानंतर गारवा हॉटेल परिसरातील एका तीव्र वळणावर बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.
नियंत्रण सुटताच बस रस्त्यावरून खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकाळ डोंगराला जाऊन धडकली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की बसमधील अनेक प्रवासी जागीच जखमी झाले. याच वेळी समोरून येणाऱ्या एका कारलाही बसने धडक दिली, त्यामुळे ती कार रस्ता ओलांडून बाजूच्या झाडीत जाऊन अडकली. सुदैवाने बस दरीत कोसळली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकांच्या माध्यमातून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ ताम्हिणी घाटातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.