प्रपंच करोनी परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग।
तुकाराम महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीच्या लेखी संसाराला नाग्याची किंमत आहे आणि जो हरिभक्तीचा आसुसलेला आहे, त्याच्या संसारात कधीच व्यथा मिळत नाहीत. प्रपंचात आपण रोज इतरांशी व्यवहार करत असतो. इतरांशी व्यवहार करताना कित्येकदा विकार उत्पन्न होऊन मन अशांत होते. दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन केल्याने मन अशांत होते. ठाकूर रामकृष्णांच्या पत्नी शारदा माँ यांना एक साधिका म्हणाली, "माँ, इतकी साधना करून देखील मन शांत होत नाही." त्यावर माँ तिला म्हणाल्या, "मुली दुसऱ्याच्या दोषांचे चिंतन करणे सोड." आपण दुसऱ्या कोणापेक्षा कसे श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांचे दोष बघत राहतो. ज्या गोष्टीचे चिंतन सुरू असते तिथेच मन चिकटते. अशाने मन भगवंतांपासून दूर जाते. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते, त्या-त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. मन सारखे धावत असते. त्याला प्रेमाने चुचकारून एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. लहान मूल एका जागी स्वस्थ नसते. ते सारखे धावते. ते कोठेही आणि कितीही वेळा गेले तरी आई तितक्याच प्रेमाने त्याला पकडून आणून एका जागी बसवते. मनाशी आपला असाच प्रेमाचा व्यवहार असायला हवा. कधी जबरदस्तीने तर कधी लाडाने त्याला समजवायला हवे.. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात - साधके एक निश्चय धरावा, तो जीवभावे पाळावा ! की कृतनिश्चय न मोडावा कदापि ! एक नियम करावा आणि तो रोज न कंटाळता पाळावा. एक माळ जप करेन, रोज तुळशीला पाणी घालेन असा सोपा असला तरी काही नियम जीवनात असावेत आणि ते कसोशीने पाळावेत. मग मन मोकळेपणे जेथे जाईल, तिथून त्याला नियम आवर घालेल आणि त्यामुळे ते स्थिरावेल. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, ते नियमच त्या धावणाऱ्या मनाला परत वर्तमानात घेऊन येतात. यामुळेच नियमांचे महत्त्व आहे. प्रपंचात तुलनेने उत्पन्न होणाऱ्या कामनांचा त्याग करावा नाही तर बहिर्मुख इंद्रिये नवनव्या आकर्षणांना बळी पडत राहतील. अंतरंगाचा प्रवास दूरच राहील. भगवंत म्हणतात अंतरंगाचा प्रवास क्रमाक्रमाने, हळूहळू होतो. त्यासाठी धैर्याने, संयमाने बुद्धिपूर्वक मनाला आत्मतत्त्वात स्थिर करण्याचा अभ्यास करावा. दिवसभर आपण एक दुसऱ्यांचे उणें दुणे काढत राहातो, एक दुसऱ्यांचा मान अपमान करत राहातो, समोरच्या व्यक्तीला कमी लेखत राहातो, मग तेच विचार मनात घोळत राहतात. याने मन अशांत होते. याउलट दुसऱ्यांचे फक्त चांगले गुण पाहिले, प्रत्येकाशी नम्रतेने लागले , प्रत्येकाप्रती मनात आदर बाळगला, गीता , संत वांङमय, या प्रकारचे वाचन तर मन शांत होते. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून म्हणतात, चित्त घेऊनिया तू काय देशी, ऐसे मजपाशी सांग आधी ।। तरिच पंढरीराया करीन साटोवाटी, नेघे जया तुटी येईल ते ।। रिद्धीसिद्धी काही दाविसी अभिलाष, नाही मज आस मुक्तीचीही ।। तुका म्हणे तुझे माझे घडे तर, भक्तीचा भाव रे देणे घेणे ।। "हे देवा मी तुला माझे भक्तियुक्त चित्त अर्पण करीन पण त्या बदल्यात तू मला काय देशील ते आधी सांग. ते म्हणतात मी तुझ्याशी व्यवहार करावयास तयार आहे; परंतु तो असा असावयास हवा ज्यामुळे तुझ्या-माझ्यात अंतर पडणार नाही. ते म्हणतात पण खबरदार जर तू मला रिद्धी सिद्धी यांसारखे काही आमिष दाखविलेस तर कारण मला यात कसलाही रस उरलेला नाही आणि एवढेच काय तर तुझ्या पुढे मला मुक्तीचीही आस उरलेली नाही. तुकोबाराय म्हणतात हे देवा जर तुला माझ्याशी व्यवहार करायचाच असेल तर तो एकाच गोष्टीचा होऊ शकतो आणि ते म्हणजे माझ्या भक्तिभावाच्या बदल्यात तू मला अपार प्रेम दे आणि माझा स्वीकार कर. आपल्याला शेतकऱ्याची कथा माहीत आहेच. त्या कथेतला गरीब शेतकरी राजाकडे मदतीसाठी गेला. त्याने राजाकडे उदरनिर्वाहासाठी थोडी जमीन मागितली. राजाने त्याला, तू पाहिजे तेवढी जमीन घेऊ शकतोस असे सांगितले; परंतु हे सांगतानाच त्याने एक अट घातली. या अटीनुसार शेतकऱ्याने त्याला हवी ती आणि हवी तितकी जमीन मिळवण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धावायचे होते. तो जेवढा धावेल आणि धावून सूर्यास्ताच्या आत जेथून सुरुवात केली तेथे परत येईल तेवढी सर्व जमीन त्याची होईल असे राजाने सांगितले. शेतकऱ्याने सूर्योदयाबरोबर धावायला सुरुवात केली. दिवसभर तो धावत राहिला. दुपार उलटून गेल्यावर त्याला प्रचंड थकवा आला तरीही आणखीन जमीन मिळेल या हव्यासाने त्याने धावणे थांबवले नाही. उन्हे कलली. आता अट पूर्ण करायची असेल, तर परत जायला हवे हे शेतकऱ्याला समजत होते पण अजून थोडी जमीन मिळेल ही अशा काही सुटत नव्हती. तो धावतच राहिला. अखेर सूर्यास्त झाला आणि आपण आता काही परतू शकणार नाही हे त्याच्या लक्षात आले. दिवसभर धावून झालेल्या श्रमाने आणि ताणाने शिवाय अट पूर्ण न झाल्याने आलेल्या प्रचंड नैराश्याने तो तेथेच गलितगात्र होऊन पडला आणि मृत्यू पावला. आता त्याला पुरण्यासाठी साडेतीन हात जमीन पुष्कळ होती. आपल्या जीवनाचा देखील सूर्यास्त होणार आहे, आयुष्याच्या अंत होणार आहे याचे भान असायला हवे. दुसऱ्याशी तुलना करत आयुष्य व्यर्थ दवडू नये. तुलनेतून निर्माण होणारे संकल्प आणि त्यातून उद्भवणाऱ्या कामना यांचा समूळ त्याग करावा. तुकाराम महाराज उपदेश करताना सांगतात की, लोकहो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तर प्रपंच नीट येत नाही.





