सातारा: नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पार्टी आणि सहलीला बाहेर गेले आहेत. पार्टी म्हटल्यावर मद्य आणि मांसाहार, मत्स्याहार हे सर्व महत्त्वाचं आहे. मात्र मद्य प्यायल्यानंतर भानावर नसलेल्या तळीरामांकडून अनेक अशक्य गोष्टी घडल्याच्या बातम्या आजवर ऐकण्यात आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे. सरत्या वर्षाच्या पार्टीसाठी कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेलेला तरुण बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महादरे-यवतेश्वर येथील डोंगर कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेनंतर शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने चार तास जंगलातून पायपीट करत घटनास्थळ गाठून तरुणाचा जीव वाचवला आहे.
शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तरुणाला दरीतून वर आणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. आदित्य कांबळे (रा. माहुली, सातारा) असे दरीत कोसळलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये सरत्या वर्षानिमित्त आदित्य कांबळे पार्टीसाठी गेला होता. पार्टीमध्ये मद्य घेतल्यानंतर लघुशंकेसाठी बाहेर गेलेल्या आदित्यचा तोल जाऊन तो महादरे-येवतेश्वर डोंगराच्या कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जंगलातून पाच किलोमीटर पायपीट करत घटनास्थळ गाठले.
मुंबई: राज्यात सध्या १५ जानेवारीला येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे देशातील सर्वात ...
शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचताच दरीत कोसळलेला आदित्य तरूण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. ४०० फुट उंचावरून थेट खाली कोसळल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. सध्या तो वैद्यकीय उपचाराखाली असून त्याला वेळेत मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर असून डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती.
कडाक्याच्या थंडीतदेखील रात्रभर बचाव मोहीम राबवत रेस्क्यू टीमने जखमी तरूणाला महादरेच्या जंगलातून बाहेर काढले. यानंतर रूग्णवाहिकेतून तरुणाला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना उत्साहाला आवर घातला नाही तर जीवावर कसे बेतू शकते, हे या घटनेतून पाहायला मिळाले.