मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित संस्था व संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या मार्गदर्शनानुसार या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रे, नेत्र तपासणी शिबीर तसेच विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या वर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना ‘सडक सुरक्षा - जीवन रक्षा’ अशी असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अशा परिवहन आयुक्तांनी व्यक्त केली आहे.