नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या पावन प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आणि जगभरातील भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या वर्धापनदिनाचे वर्णन भारताच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचा एक दिव्य उत्सव असे केले. त्यांनी भारतातील आणि परदेशातील असंख्य भक्तांच्या वतीने भगवान श्री रामाच्या चरणी आदरपूर्वक वंदन केले आणि सर्व देशवासीयांना अनंत शुभेच्छा दिल्या.
शतकानुशतके जुन्या संकल्पाच्या ऐतिहासिक पूर्ततेची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, भगवान श्री रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने, पाच शतकांतील लाखो भक्तांची पवित्र आकांक्षा पूर्ण झाली आहे. रामलल्ला आता पुन्हा एकदा आपल्या भव्य निवासस्थानी विराजमान झाले आहेत. यावर्षी अयोध्या नगरी धर्मध्वज आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठा द्वादशीच्या प्रतिष्ठेची साक्षीदार झाली आहे. गेल्या महिन्यात या धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्याची संधी लाभणे आपले भाग्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
मोदी यांनी पुढे अशी इच्छा व्यक्त केली की, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची प्रेरणा प्रत्येक नागरिकाच्या हृदयात सेवा, समर्पण आणि करुणेची भावना अधिक दृढ करो. ही मूल्ये समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी एक मजबूत पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.