हक्काच्या प्रभागांमध्ये पती-पत्नीकडून तिकिटांची मागणी
भाईंदर : ठाण्यानंतर आता मीरा-भाईंदरमध्येही शिवसेनेला घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकाच प्रभागातून पती-पत्नी किंवा कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी देण्याची मागणी होत असल्याने पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, अंतर्गत धुसफूस उघडपणे समोर येत आहे.
मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-भाजप युतीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने, खबरदारी म्हणून सर्वच प्रभागांत उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मात्र उमेदवारांची यादी तयार होत असतानाच प्रस्थापित पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून घराणेशाहीला प्राधान्य देण्याचा दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः शिवसेनेचे पारंपरिक मताधिक्य असलेल्या प्रभागांमध्ये ‘एकाच घरातून दोन तिकीट’ देण्याची मागणी केली जात असल्याची माहिती आहे. काही पदाधिकाऱ्यांकडून मागण्या मान्य न झाल्यास अपक्ष किंवा अन्य पक्षातून निवडणूक लढवण्याची धमकीही दिली जात आहे. त्यामुळे हक्काचे प्रभाग हातातून जाऊ नयेत, यासाठी पक्षनेतृत्व या दबावापुढे नमते घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रविवारी तयार करण्यात आलेल्या प्राथमिक याद्यांमुळे अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक नाराज झाल्याचे समोर आले आहे. परिणामी, नाराज गटाला सांभाळणे आणि घराणेशाहीला आळा घालणे, असे दुहेरी आव्हान शिवसेनेपुढे उभे ठाकले आहे.
१८ हक्काच्या जागांवर तिकिटांसाठी प्रयत्न :
मीरा-भाईंदर शहरात शिवसेनेच्या ताब्यात सध्या प्रामुख्याने १८ हक्काच्या जागा मानल्या जातात. या प्रभागांत शिवसेनेचा पारंपरिक मतदार असल्याने विजयाची शक्यता अधिक आहे. मात्र याच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीनेही लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील काही प्रस्थापित पदाधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांना तिकीट देण्याची मागणी पुढे आली आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधून राजू वेतोसकर यांनी स्वतःसह कुटुंबातील एका सदस्यासाठी तिकीट मागितल्याची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून विकास पाटील आणि वंदना पाटील हे दाम्पत्य निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. तसेच प्रभाग क्रमांक १३ किंवा १७ मधून विक्रम प्रताप सिंह यांचे दाम्पत्य इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मध्ये जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी सलग दुसऱ्यांदा कुटुंबीयांसाठी तीन जागांवर दावा केल्याचेही बोलले जात आहे.