आपल्या राजकीय कारकिर्दीत स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७ तसेच १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग चार वेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क ठेवत विकासकामांचा पाठपुरावा करणाऱ्या स्नेहल जाधव यांना पक्षाकडून अपेक्षित सन्मान व न्याय न मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या राजीनाम्यामुळे वॉर्ड क्रमांक १९२ सह मुंबईच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.